अधोगतीचे मूळ

अधोगतीचे मूळ !
मराठी भाषेबाबत स्वत:च दिलेल्या आदेशाची पायमल्ली करणारे मराठीद्रोही काँग्रेस सरकार !
13-05-2008

विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, हा सूज्ञ पालकवर्गाचा नेहमीचा आग्रह असतो. भारतीय शिक्षण क्षेत्रात पाश्चात्त्य शिक्षण पद्धतीने केलेला प्रवेश आपल्या संस्कृतीचा अभिमान असणार्‍यांना धोकादायक वाटतो व त्यामुळे त्यांचा शिक्षण क्षेत्रातील सुधारणांविषयी आग्रह असतो.

त्यांना अभिपे्रत असलेल्या सुधारणा या भारतीय संस्कृतीशी निगडित असतात आणि शिक्षणाची व्यवस्था करून देणार्‍यांना म्हणजे सरकारला `धर्मनिरपेक्षता' हा गुणधर्म जोपासण्याच्या नादापायी भारतीय संस्कृतीशी संबंधित बाबींचा उल्लेखच नको असतो. आजच्या शिक्षणाचा पाया ज्या थोर व्यक्‍तींनी घातला, त्यांना शिक्षण क्षेत्रातील आजची अवनती पाहून काय वाटले असते, ते सांगायला शब्द नाहीत. साधारण शंभर वर्षांपूर्वीचा काळ आपण जेव्हा इतिहासाची पाने परतत पहातो, तेव्हा शिक्षणाची काय अवस्था होती, ते सहज लक्षात येते. इंग्रजांना त्यांच्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था भारतियांवर लादायची होती आणि प्रचलित भारतीय शिक्षण पद्धती त्यांना पुरती मोडीत काढायची होती. भारतीय संस्कृतीचे शिक्षण दडपून टाकायची इंग्रजांची मानसिकता ज्या लोकांना मानवणारी नव्हती, त्यांनी स्वत:चे प्रयत्‍न सुरू करून स्वतंत्र शिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे निर्भीड नेतृत्व तेव्हा लाभल्यावर राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या प्रयत्‍नांना जोम आला. शिक्षण द्यायचे म्हणजे शिक्षण संस्था पाहिजेत आणि शिक्षण संस्था पाहिजेत तर पैसा पाहिजे, हे समीकरण त्या वेळी उभे राहिले. शिक्षणाची व्यवस्था करणे हे ध्येय होते, तर त्यासाठी लागणारा पैसा ही समस्या होती. इंग्रज अधिकार्‍यांना राष्ट्रीय भाषांतील शिक्षण देणार्‍या संस्था नको होत्या. त्यांनी त्यांच्या धोरणाप्रमाणे काही संस्था बंदही पाडल्या. यवतमाळ येथील अशीच एक संस्था बंद पाडल्यावर तेथे विशिष्ट ध्येयाने सेवा करणारे वि.गं. तथा दादासाहेब केतकर पुणे येथील संस्थेत दाखल झाले. त्यांना विद्याप्रेमी विद्यार्थी मिळाले; पण संस्था चालवण्यासाठी पैसा कमी पडू लागला. हा प्रसंग दादासाहेब केतकर यांच्यासाठी कसोटीची वेळ होती. त्यातून ते कसे यशस्वी झाले, ते पहाणे म्हणजे शिक्षण महर्षीच्या जीवनाचे दर्शन घेतल्यासारखे होईल. सध्या राजकारणातील शिक्षण सम्राट पहाण्याची आपल्याला सवय झालेली आहे. प्रथम हातात पैसा व नंतर शिक्षण संस्था, हे आजचे समीकरण आहे. शंभर वर्षांपूर्वी `अगोदर शिक्षण संस्था उभारण्याची तळमळ व नंतर त्यासाठी हव्या असलेल्या निधीची उभारणी', असे चित्र होते. दादासाहेब केतकर यांनी राष्ट्रीय शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी माधुकरीची झोळी हातात धरली. जोडीला कोरडी भिक्षा मागायला सुरुवात केली. ध्येयपूर्तीसाठी त्यांनी अक्षरश: डोंगराएवढे कष्ट उपसले. ते त्यांच्या ध्येयाला घट्ट चिकटून राहिले. माधुकरी, कोरडी भिक्षा, वर्गण्या, देणग्या आदीे नीधीसंकलनाचे सर्व प्रयत्‍न सुरू ठेवले. त्यांच्या या जिद्दीच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले, संस्था बहरत गेली. आजची `पुणे विद्यार्थीगृह' हीच ती संस्था! आजपासून ती शताब्दी वर्ष साजरे करत आहे. आजचे शिक्षण सम्राट व पूर्वीचे तळमळीचे शिक्षणयोगी यांच्या कार्याची माहिती करून घेतल्यावर आजच्या सामाजिक व शैक्षणिक अधोगतीचे मूळ दिसायला लागते.

No comments: